Sunday 24 July 2016

गावची एशटी

                                  

लोका नाक्यार उभी रवान एशटीचो कानोसो घेत होती आजुन कशी गाडी ये ना नाय!
 पकल्याचे दोन ग्लास चाय पोटात रिजवन झाले. लालाच्या दुकानार येर-  - झारो घालून मंदीचं गाड्योचो कानोसो घेवक पकलो पिंपळाच्या झाडापर्यंत जाय .तितक्यात गाडयेची घरघर लांबसून तेच्या कानार इली. "इलीs s इलीs s गाडी इली", असा आरडतच तो स्टँडवर इलो. तो पर्यंत लांब थय लाल रंगाची एशटी नजरेक पडली. सगळ्यांका हायसा वाटला. इली एकदाची असा म्हणान जो तो आपल्या जवळचा सामान हातात घेवन एशटीत चढण्याच्या तयारीत सज्ज झालो.
कळकट - मळकट धुळीत माखलेली एशटी ऐटीत येवन थांबली.

     ती थांबाची खोटी , सगळे गाडयेत चडाक पुढे पुढे करूक लागले. कोणी खिडकेतसूनच रुमाल टाकून जागा अडवता, तर कोणी  हातातली पिशी टाकून सीट बुक करता. सगळ्यांचीच धावपळ. अरे मेल्यानु ! "बायल माणसांका वायच चढाक दिया रे ", इती कन्डक्टर. दोन - चार बायल माणसांनी तितकोच चान्स घेतलो आणि "चल गो बिगीबिगी", असा म्हणान काख्येतल्याक आणि हातातल्याक  पोरांका कसा-बसा वर चढवल्यानी.
गाडयेत चढताना थार नाय आणि चढले का शिट मिलवची गडबड.

 "गे, मी थय रुमाल टाकुन जागा अडवल्य गे", रमलो आरामात चढानं इलो रुमालाच्या भरवश्यार. गर्देत रुमाल काय आणि पिशी काय , कोण इचारता? झाली वादावादी सुरु. मालग्याची आवस वायच करवादानच बोल्ली "हय रुमाल बिमाल कायव दिसना नाय. आमका जागा गावली आम्ही बसलो.  वायच सरकान घेतो थय बस कोपऱ्यार", मरांदे खिडकी नाय तर नाय वाय टेकाक मिळाला तरी खूप झाला. रमल्याक तिसरी शीट कशीबशी गावली.
        एक - एक स्टॉप घेयत गाडी फुडे जाय तशी तशी माणसांची गर्दी वाढतच जाय. शिवाय प्रत्येकाचा ढीग भर सामान . कोण वर ठेवता तर कोण शिट खाली ठेवता. माणसांका उभ्या रवाक मिळतांना मारामारी.
कन्डक्टरनी घंटी वाजवन "भटवाडी" असा म्हटल्यान का ही माणसा उठतली. मग पुढे येतली. तो पर्यंत बाकीच्यांचो हाल. "अरे आधीच पुढे येवा रे! किती येळ लावतात उतराक; चल. पुढे चला ,चला. तिकीट कोणाचा रवला काय? बोला पुढे बोला , कोणी खाली उतरणाऱ्यानी पटकन पुढे येवन रवा . न उतरणाऱ्यानी वायच मागे सरका ,चला पाठी गाडी खाली असा. तेची आपली सततची टकळी चालू.
गे आजये! अगे काय घर इल्यार उतारतलय?अगे उतर मगे. इति कन्डक्टर.
"रे मेल्या होयsss उठाक नको? ह्या बघ कसा पायात मळणी घालता हाssss. नातीचा चप्पल पायातसून धापू झाला म्हणान ता पोरग्या आजयेच्या पायाखाली शोधी होता.

आजयेक उठाकव जमा नाय, बाजूक बसलेल्या भल्या माणसानं मदत केल्यानं आणि शिट खाली गेलेली चप्पल शोधून दिल्यानं तेव्हा आजी आणि नात खाली उतारली.
मरणाचा उकडता तेच्यात ही गर्दी.

कधी एकदा आपला ठिकाण येता असा प्रत्येकाक वाटत होता.
आता सारखे तेवा पावलो- पावली रिक्शा नाय होते. दिवसातसून एक एशटी सूटा. ती चुकली तर दुसरो पर्याय कायच नाय. नाय म्हणाक काका गवळ्याची एक गाडी होती. तो त्या गाडयेतसून माशे न्हेय (.त्या गाडयेतसून  गाबत्या (मासेवाली) जायत.)  गाडयेत माश्याच्या वासाबरोबर प्रवास करुचो लागा. गाडी चुकली का ह्यो एकच पर्याय होतो. ता पन बसाक मिळत असा नाय. कसा बसा वाकान दुडान ,गर्दीत आपले सगळे अवयव सांभाळत प्रवास करुचो लागा. घाण वासानं उलटी सारख्या जाय. पोटात ढवळान येय. पण करतस काय?
घराकडे पोचाक व्हया तर सगळा सहन करुक व्हया. आताच्या पोरग्यांक सांगूनच खरा वाटाचा नाय. आता एशटीकडे कोनी बघनत नाय. जो तो रिक्शानं प्रवास करता. चार पैसे गेले तरी चलात पण आरामदायी प्रवास. नायतर चाकरमानी आपली हक्काची गाडीच गावात आणतत.
अगदी "एशीत" ऐटीत बसान प्रवास करतत. गाडयेचे काचाव खाली करू नको. आणि तेव्हा एशटीच्या खिडकेतसून हवाय लागा नाय.

पण तेव्हा प्रवासातले सहप्रवासीपण आपलेशे वातट. गावातले प्रत्येक जन एक मेकाक  सांभाळून घेयत. त्या एशटीच्या प्रवासाची मज्जाच काय निराळी होती. ती मज्जा एशीच्या गाडयेत सुध्दा नाय.
एशटीचो प्रवास तो एशटीचो प्रवास. आता फक्त आठवणींतलो. मुंबईत कधी  एशटी दिसली का माका माझ्या माहेरचा माणूस भेटल्याचो आनंद होता. तिका मी डोळे भरान बघतय अगदी दिसेनाशी होय पर्यंत.

आवस -आई 
रवला -राहिले 
मळणी घालणे - घुटमळणे 
गाबत्या - कोळी , मासेवाला

Thursday 9 June 2016

वाशाडी मामा



नावं जरी इचित्र वाटला तरी आम्ही तेंका वाशाडीमामाच म्हणत होतो. ते सदान कदा ‘वाशाडी पडो व्हरान’ असाच म्हणत.

७०रीच्या आसपास, अंगान सडपातळ. आंगार कळकट-मळकट धोतार, कपाळावर फाटको पंचो गुंडाळलेलो, हातात काठी (तेचो उपयोग होयो तसो करुक गावता, कधी झाडावरची फळा काडुक, तर कधी पायाखालचा जनावर मारुक) असो तेंचो पेहेराव.

चिलिम ओढूची तेंका सवय होती. ते चिलिम ओढूक लागले का आम्ही सगळी चिल्ली-पिल्ली तेंच्या भोवती घोळको करून बघत असाव. ते चिलिम ओढूक लागले का घुड घुड आवाज येय, तेची आमका लय मजा वाटा.

आम्ही न्हान असल्याकारणात त्यांची जास्त माहिती आमका नाय. ते खयचे? त्यांचे नातेवाईक कोण? आमका कायच म्हायत नाय. आमच्याकडे ते सगळ्या कामाक होते. घराची साफसफाईपासून ते ढोरांची राखणीकरीपर्यंत, कधीतरी काय व्हाया नको ते आणणा, बागात पाणी लावणा सगळा ते बघत. सगळी कामा ते आपलीच समजान करीत. बरेच वर्षा ते आमच्याकडे होते.

आमच्या लहानपणी घरात राबतो खूप होतो. येणाऱ्या-जाणार्यांची खळतीच नाय. तेव्हा याकच हॉस्पिटल होतो. लोका गाव-गावातसुन(लांबासून) औषध उपचारासाठी वेंगुर्ल्यात येत. पेशंट हॉस्पिटलात आणि त्याचं सोबती आमच्याकडे. लांबची आणि बरेच दिवस ऱ्हवनारी असली तर तेंची जेवणा खाण्याची सोय मग व्हायनार व्हय. तेंका एक स्टोव्ह ,थोडी भांडी देवाची लागत. थोड्या दिवसा साठी असलो तर घरचाच जेवान.

अशी माणसा इली की मामांच्या कपाळावर आटयो पडत. जसो काय मीच ह्या घरचो करतो-सावरतो आसय अशा रुबाबात ते वावरत. वाशाडी रे पडो असो सूर लायत.

आम्ही सगळी पोरा टोरा रात्री झोपताना मामांका गोष्टी सांगूक लाव. तेंच्ये गोष्टी म्हणजे भूता-खेतांचे जास्ती. ते गोष्टी अगदी रंगवत सांगित. भुताची गोष्ट सांगूक लागले का आम्ही अगदी घोळको करून बसाव. मधी बसण्यासाठी प्रयत्न करू, कारण सगळीच भूताक भिया होती. भूतान माका धरल्यान तर......गोष्ट संपली कि सगळ्यांका एक नंबरसाठी जावक तर व्हयाच पण खळ्यात जावची भीती. तेव्हा न्हाणीघर नाय,त्यामुळे भायरच जावन बसाचा लागा. एकटा जावचा धाडस कोणाकडेच नाय. मग सगळे मिळान एकमेकांच्या सोबतीत व्हायर जाव. मान खाली घालून भीत भीतच कार्यभाग आटपून पटकन घरात येव. मामा आमच्या सोबत येयत. तोंडात देवाचा नाव घेवन पटापट सगळी पोरा आपापल्या अंथरुणात कपाळावर पांघरून घेवन गप गुमान झोपाक जाव, झोपाक सुद्धा मधी जागा शोधून झोपाचो प्रयत्न करू.

एकदा तर मामांनी आमच्याच आमच्याच बागातली घडलेली भुताची गोष्ट सांगीतल्यांनी.

गावात प्रत्येकाची(बहुदा) माडाची-पोफळीची बाग आसता. तेका पाणी लावायचा असता. गावात पाटाचा पाणी मे महिन्यात सोडतत, तर प्रत्येकानं बांध फोडून आपल्या बागात घेवचा असता. रात्रीच्या येळाक नायतर फाटेक पाणी इला तर ता घेवन बागात सोडूचा असता, ह्या काम मामाच करीत. हातात कंदील आणि काठी घेवन ते एक-एक बांध फोडून पाणी लाय होते. तितक्यात बागाच्या दुसऱ्या टोकाक ओहोळा कडसून दोन बायका येताना मामांका दिसल्यो. मामांचे पाय लटपटाक लागले. तेनी कंदील खाली ठेवलेलो तो घेवक ते पुढे गेले पण त्यांच्यातल्या एका बाईने तो कंदील उचाल्यान, मामांची पाचावर धारण बसली, ते गाळी घालूक लागले. मधीच देवाचा नाव घेयत. देवांका भूता भियातात असा लोक म्हणतत. तेंची चापलाव बाजूक काडून ठेवलेली तीव खय नायशी झाली. थोड्या वेळान कंदील लांब लांब जावक लागलो. ते इतके भियाले कि पाटाच्या पाणी लावणा अर्धवट सोडून ते घराकडे इले. भियाल्यामुळे आणि थंडीमुळे तेंका हुडहुडी भरली आणि तापव इलो .

दुसऱ्या दिसाक चपला एक आमच्या बागात तर दुसरा ओहोळाच्या पलीकडे अशी मिळाली. कंदील बागात पडलेलो गावलो.असा सगळा त्येनी आमका सांगल्यावर  आम्ही आमच्याच बागात आठ दिवसतरी फिरकाक नाय. दिवसा-ढवल्यापण भीती वाटाक लागली.

असे हे आमचे वाशाडी मामा बरेच वर्षा आमच्याकडे होते. नंतर माका वाटता शीक पडले म्हणान ते गेले असतील पुढे त्यांचा काय झाला काय कळाक नाय. तो काळ असो होतो, मोठ्यांका प्रश्न काय इचारतलय? त्वांड वर करून बोलाची सोय त्या येळाक नाय होती.

तर असे हे माझ्या स्मरणातले ‘वाशाडीमामा’.

Friday 30 October 2015

संकष्टी नि चिचेबुडलो गणो


संकष्टी नि चिचेबुडलो गणो 




                                     

"आये चिचेबुडलो गणो इलो हा "

आयेक आरडान मी सांगलय आनि खळ्यात खेळाक मी गेलय.
गणो येवन रोजच्यासारखो खाली मान घालून गहन प्रश्नात असल्या सारखो वसरेक टेकान बसलो. शून्यात नजर ठेवन तो कसलो विचार करीत असता समाजना नाय. बघुचो तेव्हा तो कसल्याशा विचारांत  असता .

अंगात जुनो शर्ट, बरेच दिस तेका पाणी लागला नसात असा. साधारण पन्नाशीचो, सडपातळ कष्टान नियमित थकलेलो गणो सगळ्या गावचोच गणो होतो. कोणाचाव अडी - अडचणीक गणो धावान जाय.

आयेन पतेलेतसुन गरम पेज आणि रातची भाजी त्येका आणून दिल्यान. गण्याची तंद्री भंग झाली. आयेकडे कटाक्ष टाकून समाधानाचा हसणा तेच्या थकलेल्या तोंडावर दिसला. पातेला तोंडाक लावन तेनी गरम गरम निवळ घोटल्यान. भाजी पेज चवी- चवीन सावकाश खाल्यांन. तृप्तीचो ढेकर देवन तो उठलो.  पातेला घासून न्हानयेकडे उपडी घातल्यान आणि "येतंय गे " , असा म्हणान पुढच्या कामाक गणो गेलो.

भूक लागली का गणो कधीय येय होतो. त्या येळेक काय तयार असात ता आये पुढे करी. गण्याक म्हायत होता ही माऊली माका उपाशी पाठवची नाय. सणा वाराक आये तेका जेवक बोलय. घरात कायव गोडा धोडाचा आयेन केल्यान का तेच्यात गण्याचो वाटो असतोलोच.

येकदा आयेन माका सांगलेला आठवता, गण्याचा घर थय भटवाडीक चिचेखाली होता. घरची खूप गरिबी. तो धा-बारा वर्षाचो आसताना तेचि आवस शिक पडली. गावात डाकटर पन तेव्हा जास्त नाय होते. असले तरी कनवटीक पैसो व्हयो उपचार करुक. बरेच दिस हातरुनाक खिळान होती. पोरात जीव अडकान होतो असा लोका म्हणत. मग काळापुढे तिचाव काय चलाक नाय. गेली सोडून गण्याक.

बापूस हय-थय हिंडान कामा करी. कसा बसा दोघांचा पॉट भरा. बापाशी बरोबर गण्याव आता हातभार लावक शिकलो. गरिबीन आणि परिस्थितीन गण्याक शाळेची पायरी काय चढाक मिळाक नाय.  तेका आवाडय नाय. बापाच्या पश्यात गणो गावचो गडी झालो. कोणाक व्हया तसा राबन लोका घेवक लागली. कोणी खावक-जेवक घालीत तर कोणी पैशे देयत. गरीब स्वभावाचो गणो सांगला काम करी. कधी कोणाक नाय म्हणान नाय.

आयेविणा पोर म्हणान आमच्या आयेक तेची दया येय. आमचाव बागाची देखभाल गणोच करी. मांगरात गवताचे भारे ठेवना ही कामा गणो न सांगता करी. "गे ! पावसाळो जवळ इलो हा, लाकडा भरून ठेवक होईत ", असो गण्याचो घोको आधीच चालू जाय. कामा पार पडापर्यंत गण्याक थारो नाय.

" आज संकष्टी आसा, रात्री जेवकच येरे मोदक करतय . "

 आयेन गण्याक सांगल्यान हातातल काम न थांबवताच खाली मान घालून "व्हय " असा गण्यान म्हटल्यान.

न्हिमार वर इला  तसा आयेन  दिलेला घास- मुटला खावन गणो रमल्याच्या शेतार कामाक  गेलो. जाताना "रातचाक येतय गे ," असा सांगान गेलो.

लवकर लवकर कामा आटपाक व्होई म्हणान गणो बेगीन  बेगीन हात चालय होतो तितक्यात गवतातलो साप गण्याक डसलो . ढिगाऱ्या खालचो साप गण्याच्या नजरेक पडाक नाय. गणो आरडाक लागलो. भियान तेचा पाणी-पाणी झाला. जवळची लोका धावान इली. कसलो साप होतो कोणाकव कळाक नाय. साप कोणाक दिसाकच नाय. हास्पीटलात नेल्यानी. गावात सगळीकडे बातमी पसारली. गावात सगळ्यांका दुःख झाला. आयेक समाजल्या बरोबर आयेन हास्पीटलात धाव घेतली. गण्याकडे बघवत नाय व्होता. गणो निपचित पडान व्होतो. डाकटरांनी कसलासा इन्जक्शन दिल्यानी होतो.

आयेन गण्याच्या कपाळार, छातीर हळूवार हात फिरवल्यान. गण्यान मोठया कष्टान डोळे उघडल्यान. तेका बोलाक जमा ना. आयेकडे नुसता भरल्या डोळ्यान तेनी बघल्यान. बरा वाटाल तुका... असो दिलासो आयेन तेका दिलो. जड पावलानी आये कशी-बशी घराकडे इली. तिच्या लक्षात इला गण्याक मोदक लय आवडतत. आज जेवकय गण्याक बोलावलेला. आयेन डब्यात चार मोदक भरल्यान आणि परत इल्या पावलान तशीच हास्पीटलात गेली.

आता तर गण्या काळो-निळो  दिसाक लागलो. तेच्यात डोळे उघडूकव त्राण नाय हृवाक. आयेन मोदक तोडुन बारीक तुकडो गण्याच्या तोंडात घातल्यान. आयेचो हात थरथराक लागलो . गण्यान मोठ्या कष्टान तो घास खाल्यान.  आयो हुंदाको आवारीतच ब्हायर  इली .

त्याच रात्री गणो सगळ्या गावाक सोडून गेलो. त्येच्या मागे रडणारा असा कोणी नाय व्हता.   पण आख्खो गाव मात्र हळहळलो.

तेव्हा पासून दर संकष्टीक आये पानावर कावल्याक मोदक ठ्येय . अगदी न चुकता. आयेचा आणि गण्याचा काय नाता होता ?

आज मी पन्नाशी पार केलय पण ह्यो चिचयो बुडलो गणो विस्मरणात जावक नाय. आजुनय संकष्टीक मोदक केल्या काय आये बरोबर गण्याचीच आठवण येता.


चिचयो बुडलो - चिंचेच्या झाडा खालचा.
वसरेक -ओसरी
कनवरीक - हाता जवळ ( हातात )
मांगर - गोठा
घास -मुटला - खाणं ( किंवा जेवण)
रातचाक - रात्री
भियान -घाबरून
निपचीत -शांत

Wednesday 15 April 2015

वाडवाळ ( राखणो )


वाडवाळ ( राखणो )

सकाळ पासून बबन्याची लगीन घाई चलली हा… आज काय आसा समजना नाय…

" रे बबन्या मेल्या काय शोधतय… ? कसली रे धावपळ तुझी ? "
आबान गडग्याच्या पैल्याडसूनच कुकारो घातल्यान…
" मेल्या कोम्बो खय गावना नाय. " बबन्याची भिरभिरती नजर वायाच आबार स्थिरावली.
" घरातल्यांका सांगलय पांजये खालचो कोम्बो सोडू नको. सगळ्याच कोंबड्यान्का सोडून घातल्यानी, आता हेका खय शोदू… ?"

आता आबाच्या लक्षात इला आज बबन्याकडे वाडवाळ आसा. आबाचो प्रश्न.
" वाडवाळ काय रे ? “ 
" होय, मग येतंय सांगाक " असा म्हणान बबनो कोंब्याच्या शोधात गेलो.

आजून बरीच कामा पडलीत...
घाड्याक आमंत्रण देवूचां आसा….
वाड्यात सगळ्यांका सांगुचा आसा….
बाजारात जावचा आसा….

आज काय बबन्याचो पाय जमिनीवर थारावना नाय…

" गोssss श्यामल्या, त्या कोयत्याक धार काढून ठेव गो… मी वायच बाजारात जावन येतंय…
पत्रावळी घरात किती ते बघ गो… द्रोणव असतले बघ… भजनाक आणलेले ते…
खुटयेक पिशी लावलेली आसा बघ…
काय काय आणुचा ता एकदाच सांग. 
माका परत परत जावक नको…
न्हिमार मेला असा लागता हाssss आणि वायच जरा पाणी खावक आण गो…”

सकाळ पासून पाणी घोटूक बबन्याक फुरसत नाय…

वर्षातसून येकदा घराच्या मागच्या बाजुक राखणो देवचो आसता.
वर्षभर आपल्या घराचो आणि कुटुंबियांचो राखण केल्या बद्दल ह्यो राखणो देवचो आसता.
हेका कोणी वाडवाळ म्हणतत तर कोणी राखण म्हणतत…
संध्याकाळी गावचो घाडी येवन गार्हाणा घालता आणि कोम्बो देता.
चिर्याचे मोठे चुली घालून जेवण करतंत…

बबन्यान गण्याक वायच मदतिक घेतल्यान. तेनी पत्यारो येकठय करून आग लावल्यान आणि जेवणावळ बसाची जागा साफ करून घेतल्यान… 
येक बल्ब आणून लाईट जोडल्यान… (पूर्वी ग्यास बत्ती पेटवत.)
मोठे टोप घासून तेका थामान मारून ठेवल्यान… ( थामान कुणी मातयेचा मारतत तर कोणी रखयेचा मारतत ) कामा काय थोडी असतत...
संध्याकाळी घाडी इले… तेनी मागच्या पोरसात नजर फिरयल्यान.
सगळी तयारी बबन्यान व्यवस्थित केलेली दिसली.
घरातले सगळे जाणकार इले घरातलो करतो पुरुष पुढे सरलो.
घाड्यान पानपाकळी कोम्बो मानवल्यान… आणि गार्हाण्याक सुरुवात केल्यान…

" बारा गावच्या बारा येशीच्या… बा देवा लिंगेश्वरा,गांगेश्वरा, गावदेवी माउली, अंगाणेवाडची भराड़ी तसेच पिपळाखालच्या, चिचेबुडल्या देशापरदेशात गेलल्या सगळ्यांका रे महाराजा… व्हय महाराजाssss…
आता पर्यंत जसा तू या घराचो राखण करीत इलय… तसोच जागरूक रवान घरावर… पोरा बाळांवर… लक्ष ठेव रे महाराजा…. व्हय महाराजाssss "

सगळ्यांनी तेका जोरात साथ दिली… घाडयान फक्कड असा गार्हाणा घातल्यान…
चूल रणरण पेटवन तेचार आदाण ठेवल्यान… आणि कोम्बो सुटी केल्यान…
भात-सागोती तयार जाय पर्यंत गावचे सगळे एक एक करून येवक लागले…
चोपाळ्यार पानाची तबकडी ठेयलेलीच होती…
जो तो येय आणि व्होया तसा पान तयार करून घेय…
पानान तोंड रंगला तसा गजालिकव रंग चढलो…
घाड्याचा जेवण तयार झाला तशे पंगती वाडुक सुरुवात झाली…

ह्या कामाक बायल माणसांका घेनत नाय… तेव्हा सगळा काम बापयेच करतत…

सगळे पोटभर जेवले मा ?
बबन्यान सगळीकडे एकदा नजर टाकल्यान,
कोणी चुकलो माकलो रवलो काय ?
मग बाकीचे बापये जेवक बसले…

बबन्याच्या घरचो वाडवळाचो कार्यक्रम व्यवस्थित पार पडलो…
सगळे तृप्तीचे ढेकर देवन आपापल्या घराक जावक गेले…

बबनो मागचा पुढचा काम आटपून घरात इलो…
येक काळजी पार पडली… 

बाईल पाणी हाणून दिता…
अगो म्हागाइच्या दिसांत लय भारी काम जाता गो… 
देवान आपला व्यवस्थित करून घेतल्यान… देवाक काळजी… दुसरा काय !

अहो खेका काळजी करतात…? तो सगळा करून घेणारो आसा.  आपणाक जमता तसा करुक व्होया… काय काळजी करू नको… 

व्हय गो तोच करून घेतोलो…
देवापुढे नतमस्तक होवन बबन्या म्हणता… 
"असाच सालाबाद परमाना तुझी सेवा माझ्याच्यान  होव दे रे म्हाराजा ! "  

त्येनी हात जोडल्यान नतमस्तक होवन नकळतच त्याच्या तोंडात शब्द ईले...

" असोच लक्ष ठेव रे म्हाराजा !!! "


कुकारो             =     आवाज दिला
गावना नाय      =     मिळत नाय
पांज                =     कोंबड्यांना झाकायची टोपली
पत्यारो            =     झाडाची वाळलेली खाली पडलेली पानं
येकठय             =     जवळ करणे,  गोळा करणे
थामान            =     ओली माती किंवा राख पातेली च्या मागे लावणे
पोरसात          =     परिसर
सुटी केल्यान     =     साफ केल्यान

Saturday 21 March 2015

म्हातारी

    कोकणात काय नाय आसा....
सगळा आसा....
तरीपण थयल्या  माणसांका त्याचो गर्व नाय आसा...
साधी राहणी...सरळ स्वभाव...
म्हणानच कोकणातली माणसा म्हणतंत...
येवा कोकण आपलोच आसा...
हयलो निसर्ग...
हयले मासे...
हयली फळा-फुला काय काय म्हणान सांगा...
तर अशा या रम्य कोकणात माझा घर...
माझ्या कोकणातली भाषा तर सगळ्यांकाच तिच्या प्रेमात पाडता...
माका अभिमान  आसाव मी मालवणी असल्याचो...
आता मी एक-एक फुलरूपी  गोष्ट घेवन ह्यॊ वळेसार तयार करूचो प्रयत्न करूक सुरूवात करतंय...
मायभवानी आणि रामेश्वराच्या पायार ही फुला अर्पण करतंय...

पहीला फूल....'म्हातारी'...                                                            


म्हातारी


"गो" गोsss…  खय चललय…???  घोटयेत काय आसा ता… ? " बाजूच्या घरातल्या म्हातारेन माका हटकल्यान…
 तीचोच डोळो चुकान माका जावचा होता… पण म्हातारी झाली तरी आजून नजर शाबूत आसा… 
कोण खय जाता ? काय करतां ? काय बोलता ? काय खाता ? सगळे चांभार चौकशे होये हिका… 
घरात काय शिजता… तां हिका वासा वरसून नाय, तर आवाजा वरसून बरा कळतां… 
 भिड्यावर घावण्याचा पीठ घातला आणि चर्ररर… असो आवाज इलो का तिका समजां…  आज घावणे… 
" आज जेवणाक घावणे काय गोsss… कोण पावणो येतां कि काय ? मग कोम्बो असतलोच " 
झाली… आजीये ची क, का, कि, की, ची बाराखडी सुरु झालीच… मग तिच्यापासून कायव दडान रवाचा नाय… 

माझ्या घोटयेत ओवळा होती…   " आजी व्होळावरसून ओवळा आणलंय… " असा म्हटल्यार आजीयेन तोंड उघडल्यान… 
" वायच चार माका दिगो… वळेसार करून देवाक घालतय " 
हिका काय नको असा नाय… सगळ्याचो सोस… म्हणतली चार…  पण घेतली पसोभर… 
मी इतक्या मेहनतीन व्होळार जावन फुला जमा केलंय… हिका काय मागांक… मनातसून वायच चरफडतच तिका  मी ओवळा दिलंय… 
माजो एक वळेसार कमी जातलो…  आजीये चो रागच इलो माका… 

तिच्या घरांत ती एकटीच रवा होती… तिची  चेडवा मुंबैक रवत … कधी-मधी तिका भेटाक येयत…
आजी दाणो-गोटो भरून ठेय… में महिन्याक आंबे खावक चेडवा येयत… 
खालच्या खोल्येत आड्ये घालून ठेय… आंब्याचो घमघमाट घरभर सुटा… 
चेडवा येवन मनसोक्त ताव मारीत… उरला सुरला… आजी बांधून देय… 

एकदा आजी शिक पडली… माझ्या बाबांनी तिका औषध पाणी केला पण तिका काय बरा वाटा नाय… 
शेवटी आजी आपल्या चडवाकडे मुंबैक गेली… थयसर जावची इच्छा तिका अजिबात नाय होती… पण करतली काय… ? इकडे कोण बघीत ? 

मुंबैक गेली ती परत काय येवूक नाय… घराक कुलुपच लागला… 

घोट्येत्सुन फुलां नेताना आज्येच्या दाराकडे माझो लक्ष गेलो… ओगीचच…आज्येचो भास झालो… 
आज वळेसार करुक खूप फुलां आसत पण तो हुरूप नाय… आजीची आठवण ईली… 
दाराच्या पायरेर चार ओवळा ठेयलंय…  मनात म्हटलंय आज्ये हि घे ओवळा तुका… सुगंधी वासाची… 
…आजव तो ओवळाचो  वास आठवणीत्सून दरवळता आणि आजीपण… 


घोटयेत = ओटी 
ओवळा = बकुळी 
व्होळ   = ओहोळ 
आड्ये = आंबे पिकवण्यासाठी ठेवलेली टोपली किंवा खोका…   

वळेसार = गजरा